पानांवरून विरत चाललेला वारसा
अलीकडच्या काही वर्षांत भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात जी एक अत्यंत दुर्लक्षित हानी होत आहे, ती म्हणजे पुस्तकांची हानी. पूर, वादळे, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींत अनेक दुर्मीळ, जुनी, हस्तलिखिते आणि ग्रंथ कायमचे नष्ट झाले. काही पुस्तकं तर अशी होती, की ती गेली आणि त्यांच्यासोबत एक संपूर्ण काळ, एक संपूर्ण विचारप्रवाहच हरवून गेला.
आज आपण डिजिटल युगाच्या उंबरठ्यावर उभे आहोत, पण तरीही पुस्तकसंवर्धनासाठी काम करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. जणू पुस्तकं ही फक्त कपाटात ठेवायची वस्तू झाली आहेत; त्यांचं जिवंत अस्तित्व, त्यांचं मोल आपण विसरत चाललो आहोत.
“कागदावर उतरलेला शब्द मरत नाही,
तो माणसाच्या स्मृतीत श्वास घेत राहतो.”
परंतु दुर्दैव असं की, अनेक ग्रंथालयं, प्राचीन हस्तलिखितं, धार्मिक आणि ऐतिहासिक ग्रंथ आंदोलनांत, संपांत, धार्मिक व प्रादेशिक वादांत जाळले गेले. आग फक्त कागदाची नसते; ती विचारांची, संवादाची आणि संस्कृतीची असते. काही जळालं, काही वाहून गेलं, तर काही आपल्या उदासीनतेतच नष्ट झालं.
आज इंटरनेट, स्कॅनिंग, डिजिटल अर्काइव्हज्, क्लाउड स्टोरेज यांसारखी साधनं आपल्या हातात आहेत. तरीही प्रत्यक्षात पुस्तकसंवर्धनाचं काम फारच कमी ठिकाणी, फारच मर्यादित प्रमाणात होत आहे. आपल्याला वाटतं, “कोणीतरी करेल.” पण ते कोणीतरी क्वचितच सापडतं.
माझ्या मनात नेहमी एक प्रश्न उठतो—
पक्षी, प्राणी, जंगलं यांच्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे मारुती चितमपल्ली, डॉ. सलीम अली यांच्यासारखे संशोधक झाले, पण पुस्तकांसाठी, हस्तलिखितांसाठी, लोकसाहित्य आणि ज्ञानपरंपरेसाठी आयुष्य अर्पण करणारे किती आहेत? त्यांच्या कामाचा वारसा पुढे नेणारे हात इतके कमी का?
“जंगल जपणारा ऋषी झाला,
पण शब्द जपणारा विरळा झाला.”
पुस्तकं म्हणजे फक्त अक्षरांची मांडणी नाही; ती अनुभवांची, संघर्षांची, शोधांची साक्ष असतात. एखादं पुस्तक नष्ट होणं म्हणजे एका माणसाचं नाही, तर एका पिढीचं मौन. आज आपण वाचणं कमी केलंय, जपणं तर आणखीच कमी.
माझ्या आयुष्यात एकदा एका जुन्या गावातल्या बंद पडलेल्या वाड्यात गेलो होतो. धूळ खात पडलेली काही फाटकी पुस्तकं दिसली. पानं ओली, अक्षरं मिटलेली. तेव्हा जाणवलं—या पुस्तकांना कोणताही शत्रू नव्हता; त्यांचा शत्रू होता आपला विसर.
“पुस्तक जळत नाही तेव्हा प्रश्न उरतो,
आपणच का त्याला हळूहळू मारतो?”
आज गरज आहे ती पुस्तकांकडे पुन्हा माणूस म्हणून पाहण्याची. डिजिटल माध्यमांचा उपयोग करून, पण मुळ ग्रंथ जपून ठेवत, ग्रंथालयांना मंदिरासारखं महत्त्व देण्याची. नाहीतर उद्या आपल्या मुलांना इतिहास सांगताना आपण फक्त एवढंच म्हणू—
“हे सगळं कधीतरी पुस्तकांत होतं… पण ती पुस्तकं राहिली नाहीत.”
—केदार कुलकर्णी
No comments:
Post a Comment