Sunday, July 26, 2026

देश आंदोलन आणि सुधारणा

 भारतासारख्या विशाल, विविधतेने नटलेल्या आणि खंडप्राय देशात सुधारणा करणे ही अत्यंत गुंतागुंतीची आणि दीर्घकालीन प्रक्रिया आहे. येथे भाषा, संस्कृती, सामाजिक रचना, आर्थिक स्तर आणि भौगोलिक परिस्थिती यामध्ये प्रचंड वैविध्य आहे. त्यामुळे कोणतीही सुधारणा एकाच वेळी सर्व स्तरांवर परिणामकारक होईल, अशी अपेक्षा ठेवणे वास्तववादी नाही. सुधारणा टप्प्याटप्प्याने, समन्वयाने आणि सर्व घटकांच्या सहभागातूनच शक्य आहेत.

आज अनेक विद्यार्थी सरकारी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून परदेशात उच्च शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांनी देशात परत येऊन येथे मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी करणे अपेक्षित आहे. मात्र काहीजण परत आल्यावर केवळ स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी किंवा विशिष्ट विचारसरणी पुढे नेण्यासाठी समाजात गोंधळ निर्माण करताना दिसतात. यामुळे समाजात संभ्रम निर्माण होतो आणि वास्तविक समस्यांकडून लक्ष विचलित होते. देशाला ‘आझादी’पेक्षा अधिक गरज आहे ती जबाबदारीने काम करणाऱ्या नागरिकांची.

जपानसारख्या देशाने प्रगती केली कारण तेथील लोकांनी शिस्त, कष्ट आणि सामूहिक हिताला प्राधान्य दिले. आपल्या देशात मात्र अनेकदा जातीवाद, विचारसरणीचे राजकारण किंवा आंदोलनाच्या नावाखाली स्वार्थी अजेंडे राबवले जातात. जर देशातील प्रत्येक लहान गटाने सतत आंदोलनाचा मार्ग अवलंबला, तर प्रशासन ठप्प होईल आणि त्याचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना बसेल. म्हणूनच नागरिकांनी सजग राहणे अत्यंत आवश्यक आहे.

देशात सतत बंद, आंदोलने, जाळपोळ आणि तोडफोड यामुळे व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य जनतेचे मोठे आर्थिक नुकसान होते. उद्योगधंदे बंद पडतात, रोजगारावर परिणाम होतो आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या हिंसक आंदोलनाला विरोध करणे गरजेचे आहे. शांततापूर्ण मार्गाने, संवादातून आणि कायदेशीर चौकटीत राहून प्रश्न सोडवणे हीच योग्य दिशा आहे.

विद्यार्थ्यांच्या समस्या महत्त्वाच्या आहेत, परंतु त्या तात्काळ सुटणाऱ्या नाहीत. कारण या समस्या केवळ सरकारविरोधी नसून त्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेशी निगडीत आहेत. शिक्षणाची गुणवत्ता, अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती आणि मूल्यव्यवस्था यामध्ये बदल आवश्यक आहे. यासाठी शिक्षक, शिक्षणसंस्था, पालक आणि सरकार या सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. आधुनिक काळानुसार विचारसरणी बदलणे, तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे आणि गुणवत्तेला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे.

केवळ टीका करणाऱ्यांकडे या सर्व समस्या सोडवण्याची क्षमता नसते. सुधारणा ही प्रणालीगत असते आणि त्यासाठी शासन, प्रशासन आणि तज्ज्ञ यांची समन्वयित भूमिका आवश्यक असते. मजबूत, कुशल आणि जबाबदार हातांनीच 135 कोटी लोकांच्या समस्या सोडवता येतील.

आजच्या काळात देशाला गरज आहे ती एकजुटीची, सकारात्मक विचारांची आणि जबाबदार कृतीची. आंदोलन, टीका आणि मतभेद हे लोकशाहीचे भाग आहेत, परंतु त्यांचा उपयोग रचनात्मक बदलासाठी झाला पाहिजे, न की समाजात फूट पाडण्यासाठी.

— केदार मुकुंद कुलकर्णी

No comments:

Post a Comment