Thursday, June 18, 2026

बुद्धदर्शन


 



बुद्धदर्शन


डोळ्यासमोर उभा आहे तो,
शांत... पण आज जरा वेगळा,
ध्यानात नाही हरवलेला,
जगाकडे पाहत थोडा थकलेला...

त्या चेहऱ्यावरचं ते अमिट हास्य,
आजही आहे... पण किंचित फिकट,
जणू काळाने स्पर्श करून विचारलं—
“तू अजूनही एवढाच नितळ का?”

शांतता आहे तशीच गूढ,
पण तिच्या गर्भात आता प्रश्न आहेत,
मानवाच्या बदलत्या चेहऱ्यांचे,
आणि मुखवट्यांच्या गर्दीचे...

तो पाहतो आजचं नवं युग—
जिथे शब्द गोड, पण मनं खोटी,
जिथे नात्यांना किंमत नाही,
आणि सत्याला जागा नाही...

क्षणभर तोही कदाचित कंटाळतो,
या मतलबीपणाच्या वादळाला,
पण तरीही त्याच्या डोळ्यांत,
करुणेचा दिवा विझत नाही...

“माणसं बदलतात...” तो हळूच म्हणतो,
“पण आशा बदलू नये,”
आणि पुन्हा एकदा,
तो स्वतःलाच सापडतो—शांततेत...

केदार मुकुंद कुलकर्णी

No comments:

Post a Comment