गिधाडे – समाजाच्या अधःपतनाचा आरसा
गिधाडे
दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटना पाहिल्या आणि विजय तेंडुलकरांच्या ‘गिधाडे’ नाटकाची आठवण झाली. समाजातील ढासळलेली नैतिकता आणि संस्कार त्यांनी कुटुंबाच्या गोष्टीतून मांडले. त्यावेळी या नाटकाने आणि कलाकृतीने मराठी रंगभूमीवर तसेच समाजामध्ये प्रचंड वादळ निर्माण केले. सर्वत्र यावर उलटसुलट मंथन झाले आणि श्रीराम लागू तसेच इतर कलाकारांच्या दर्जेदार, कसदार अभिनयाने ते गाजले.
समजाने माणसाच्या मनात इतकी क्रूरता, वासना आणि अनैतिकता असते का? संपूर्ण मानव समाज असा होऊ शकतो का? की यात फक्त नकारात्मकता दाखवली आहे? अशा अनेक प्रश्नांसह हे नाटक गाजले. पण आज विजय तेंडुलकर असते तर? आजोबांनी ९ वर्षांच्या स्वतःच्या नातीवर पुण्यामध्ये केलेला अत्याचार पाहून ‘गिधाडे’ ऐवजी त्यांना काय निवडावे लागले असते? गिधाडालाही लाज वाटावी अशी अवस्था सध्या आपल्या समाजामध्ये आली आहे.
नसरापूरमधील घटना असो की बेंगळुरूमधील पती-पत्नीमधील विकृत प्रकार असो, समाजात चांगल्या संस्कारांची किंमत कमी होत असल्याचे हे स्पष्ट लक्षण आहे. पुरुषाने कोमल, विचारशील असणे हे ‘बाईलपणाचे’ किंवा ‘मुलमुलीत’ समजले जात आहे, ही अत्यंत धोकादायक मानसिकता आहे. मुलांना चांगले संस्कार आणि कला शिकवण्यापेक्षा वाढदिवस, गाड्या, व्हिडिओज, मोबाईल्स यांचा भडिमार होत आहे आणि त्यालाच ‘स्टेटस’ समजले जात आहे. मग येणारी पिढी जंगलराज निर्माण करणार नाही तर काय?
फक्त सरकारला दोष देण्यापेक्षा स्वतःची जबाबदारी काय, याकडे देखील संपूर्ण समाजाने लक्ष दिले पाहिजे. येणाऱ्या काळात या असल्या समाजातील ‘गिधाडां’मुळे आणि खराटसारख्या प्रवृत्तीमुळे संपूर्ण समाजाची बदनामी होत आहे. ती थांबवली नाही तर याहूनही मोठे प्रकार घडल्याशिवाय राहणार नाहीत.
आज गरज आहे ती केवळ निषेधाची नाही, तर आत्मपरीक्षणाची आहे. घराघरात संस्कारांची पुन्हा उभारणी करण्याची आहे. मुलांना केवळ शिक्षण नव्हे तर माणुसकी शिकवण्याची आहे. स्त्री-पुरुष समानता, परस्पर आदर आणि मर्यादा यांची जाणीव करून देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
नुसते शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही; आपल्या समाजातील मुलामुलींचे रक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, तेही आपले लहानसहान स्वार्थ बाजूला ठेवून. समाजामध्ये चांगल्या संस्कारांचे बीज रोवण्याची वेळ आली आहे; नाहीतर सगळेच लांडगे होतील आणि लहान मुलींचे सुद्धा जगणे अशक्य होईल.
हा केवळ इशारा नाही, तर वास्तव आहे—आणि ते बदलण्याची जबाबदारी आपलीच आहे.
—केदार मुकुंद कुलकर्णी

No comments:
Post a Comment