स्मृतींच्या पलीकडचा स्पर्श — एक हरवलेला काळ
परवा आपल्या अतिशय लाडक्या गायिका आशाताई यांच्या अंत्यसंस्काराचे दृश्य पाहताना मनात अनेक विचार दाटून आले. त्या क्षणी फक्त एका व्यक्तीचा निरोप नव्हता, तर जणू एका संपूर्ण काळाचा, एका युगाचा अंत डोळ्यासमोर उभा राहिला होता.
आशाताई आणि त्यांच्या पिढीतील कलाकार म्हणजे जणू शंभर वर्षांचा इतिहास आपण प्रत्यक्ष अनुभवत होतो. त्यांच्या आवाजात, त्यांच्या हसण्यात, त्यांच्या स्पर्शात एक जिवंतपणा होता—जो आता हळूहळू दूर जात आहे. पुढच्या काळात आपल्याला त्यांचे गाणे ऐकायला मिळेल, व्हिडिओ पाहायला मिळतील, पण त्या भावनांचा "सजीव स्पर्श" कधीच अनुभवता येणार नाही. ती अनुभूती कृत्रिम राहील, आठवणींत अडकलेली.
काही गोष्टींचा आनंद हा त्यांच्या जिवंतपणातच असतो. जसं एखाद्या गायीचं वासरावरचं प्रेम किंवा हत्तीण आपल्या पिलाची घेत असलेली काळजी — हे दृश्य प्रत्यक्ष पाहण्यात जो आनंद आहे, तो कोणत्याही चित्रात किंवा व्हिडिओमध्ये मिळत नाही. तसंच या महान कलाकारांचं अस्तित्व त्यांच्या कलाकृतीत जरी जिवंत असलं, तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा उबदार स्पर्श हरवणं ही एक मोठी पोकळी आहे.
आज भारतातील मिलेनियल पिढी हळूहळू पस्तिशीकडे झुकत आहे. आयुष्यातील "हरवणं" म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीचं जाणं किती खोलवर परिणाम करतं, याची जाणीव आता खरी होत आहे. त्यामुळेच जेव्हा जुन्या काळातील मोठे कलाकार आपल्यातून निघून जातात, तेव्हा मनाला अधिक तीव्र धक्का बसतो. तेव्हा अजून एक जिवंत दुवा निखळल्याची भावना निर्माण होते. हळूहळू हे दुवे संपतहोत चालले आहेत, ही जाणीव मनाला हळवी करून जाते.
त्या दिवशी हेलन आणि सचिन तेंडुलकर यांना पाहिलं, त्यांच्या त्या कापऱ्या पण प्रेमळ आवाजात आणि स्पर्शात एक वेगळीच शांतता जाणवली. वय जसजसं वाढतं, तसं मन अधिक स्वच्छ, निर्मळ आणि निराकार होत जातं. जसं पिकलेलं फळ नेहमी गोड असतं, तशी ही माणसंही अनुभवांनी परिपक्व होऊन अधिक गोड, अधिक प्रेमळ बनतात. त्यांच्या भावनांमध्ये कोणताही दिखावा राहत नाही—फक्त शुद्ध, निरपेक्ष प्रेम उरतं.
आशाताई किंवा हेलनजी या फक्त त्यांच्या कुटुंबातील आजी नसतात, त्या संपूर्ण समाजाच्या, आपल्या सगळ्यांच्या "आजी" बनून जातात. कारण त्यांच्या कलेने, त्यांच्या अस्तित्वाने त्यांनी आपल्याला जे दिलं आहे, ते केवळ मनोरंजन नाही, तर आयुष्यभर सोबत राहणारी भावनिक शिदोरी आहे.
आज त्या आपल्या सोबत नसल्या, तरी त्यांच्या आठवणी, त्यांचा आवाज, त्यांची ऊब कायम आपल्या मनात जिवंत राहील. पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यात हे मान्य करावंच लागतं—काहीतरी खूप मोठं हरवलं आहे… आणि त्या हरवण्याची जाणीवच कदाचित आपल्याला अधिक माणूस बनवते.
केदार मुकुंद कुलकर्णी

No comments:
Post a Comment